'युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:52 PM2020-01-30T12:52:45+5:302020-01-30T12:53:22+5:30
मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का?
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी देण्यात आली होती. तसेच 26 जानेवारी पासून नाइटलाइफची सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी नाइटलाइफला हवा तसा मुंबईकरांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सरकारने कोणत्याही पद्धतीचे नियोजन न करता घाईत नाइटलाइफबाबत निर्णय घेतला असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी देखील नाइटलाइफ वरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सरकारने घेतलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला भाजपाकडून विरोध करण्यात येत आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करुन पोलिसांची तयारी नसतानाही नाइटलाइफचा निर्णय लादला आहे. मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरावायचे का असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
आरे मेट्रो कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये मेट्रो 3चं कारशेड इतर ठिकाणी हलवणं व्यवहार्य नाही. त्यामुळे आरे कॉलनीमध्येच काशेडचं काम सुरु करण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांनी आरे मेट्रो कार शेडबाबत समितीचा अहवाल सादर झाला असला तरी तो बंधनकारक नाही असे मत व्यक्त केले होते. आदित्य ठाकरे यांच्या या विधानावर एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.
पोलिसांची तयारी नसतानाही नाईटलाईफचा निर्णय लादला.. तज्ञ समितीने आरे कारशेडचा दिलेला अहवाल बंधनकारक नाही म्हणे.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2020
मग आता नुकसान सहन करुन मुंबईकरांनी फक्त बालहट्टच पुरवायचे का ?
एक दिवस युवराजांनी मला "म्हातारीचा बुट" हवाय म्हणून बालहट्ट केला नाही म्हणजे मिळवलं!
पहिल्या दिवशी नाइटलाइफला मुंबकरांनी अल्प प्रतिसाद दिला. हॉटेल आणि मॉल रात्री 3 वाजता बंद करण्यात आले, तसेच काही ठिकाणी तर रात्री १२ नंतरच ऑर्डर घेणे बंद करण्यात आले होते. अनेक मॉल चालकांनी अद्याप निर्णय घेतलाच नाही. दरम्यान, वीकेंडला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा हॉटेल आणि मॉलचालकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईत नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. 'पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,' असे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
आता कुणा 'दादा', 'काका'ला घाबरायचं कारण नाही; काकडेंची 'पवार'बाज फटकेबाजी
'...तर भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी तयार आहे'
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या पदरी निराशा; शेतकरी सन्मान निधीला लागणार कात्री?