मुंबई - कोरोना विषाणूच्या फैलावाामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती आणि राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेला अनागोंदी यावरून भाजपाने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी एक कविता ट्विट करून राज्यातील आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
ट्विट केलेल्या कवितेमधून शेलार म्हणतात की, ‘’राज्यात शेतकरी हवालदिल झालेले आहेत. तर शिक्षणक्षेत्रातील अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी लटकले आहे. राज्यातील सरकारचा आधी घोषणा, मग निर्णय आणि नंतर अभ्यास असा कारभार सुरू आहे. परीक्षांबाबत राज्यात असलेल्या ११ विद्यापीठांचं एकसूत्र कसं ठरेल हा मोठा पेच आहे.’’
तसेच राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या वारंवार होत असलेल्या बदल्यांवरही टीका केली आहे. ‘’राज्यात तीन कारभारी आणि रोज बदला अधिकारी असा लय भारी कारभार सुरू आहे,’’असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
दरम्यान, आशीष शेलार हे राज्य सरकारच्या कारभारावर वारंवार टीका करत आहेत. कोरोनाच्या संकटात होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या नियोजनावरूनही शेलार यांनी काल सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. राज्यात कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता यावर्षी गणेशोत्सव विशेषतः. सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी भूमिका शासनाने घेतली असली तरी मुर्तीची उंची व सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतचे नियम अद्याप स्पष्ट न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. तयारीला लागणारा वेळ पाहता विलंब न करता शासनाने वेळीच नियमावली जाहीर करावी, अशी विनंती भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून नुकतीच केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या