मुंबई: स्वार्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या बसवण्यात आलेल्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध राजकीय नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या जून्या आठवणींना उजाळा दिला.
मनसेप्रमुख राज ठाकरे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय गैहजर राहिले. उद्धव ठाकरेंच्या या अनुपस्थितीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे. मला वाटते हा कार्यक्रम अराजकीय होता. त्यांच्याही पक्षाचे लोक होते. उद्धवजी स्वतः आले नाहीत, असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार पुढे म्हणाले की, स्वतः मात्र अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर गुलूगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचे राजकारण पाहत आहेत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांच्या भगवाधारी तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर मिळतील की, नाही यासाठी एका विशिष्ट गटाच्या मताचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले नाहीत असा आमचा कयास असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितले.
आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांना इंग्रजी तरी येते का? त्यांनी इंग्लिशमध्ये एखादे वाक्य बोलून दाखवावे. एखादे भाषण करून दाखवावे. त्यामुळे स्वतःला जमत नाही त्याबाबत दुसऱ्याला दिशादर्शन करणे हे काही बरोबर नाही. मी, आज त्यांना विचारणार नाही की, उद्धव ठाकरे इंग्लिशमध्ये बोलू शकतात का? पण मुद्दा असा आहे की, जे स्वप्नामध्ये बायडन आणि कृशोवला भेटतात त्यांना सगळेच स्वप्नामध्ये भेटतात असे वाटत असेल. दावोसमधील करारामध्ये झालेले आकडे बघून त्यांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली म्हणून असे हास्यास्पद संजय राऊत बोलतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"