मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:07 PM2020-01-06T21:07:35+5:302020-01-06T21:21:30+5:30

जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केला होता.

BJP leader Ashish Shelar has criticized Minister Jitendra Awhad | मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

मंत्री झाल्यामुळे आता आमदार असल्यासारखं वागू नका; आशिष शेलारांचा जितेंद्र आव्हाड यांना टोला

googlenewsNext

मुंबई: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध मुंबईतही व्यक्त करण्यात येत आहे. मध्यरात्रीपासून गेट वे ऑफ इंडियाजवळ सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या ठिय्या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील सहभाग घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड यांनी जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केला होता. जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

आशिष शेलार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी सांभाळून बोलावं. तसेच आता कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आमदार असल्यासारखं वागू नये असं म्हणत आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाड यांना टोला लगावला आहे.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे रविवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. आज सकाळीही विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आव्हाड यांनी जेएनयूतल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सरकार कोणतंही असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाण चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच सरकार कोणतंही असलं तरी विद्यार्थ्यांना मारहाण चुकीची असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. जेएनयू विद्यार्थ्यांच्या हुशारीला सरकार घाबरत असल्याचे दिसून येत आहे. सरकार जेव्हा अशा विद्यार्थ्यांवर हल्ला करते तेव्हा अराजकता आली आहे, असे म्हणावे लागत असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये रविवारी सायंकाळी विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. त्यावेळी दगडफेक आणि हिंसाचारात १८ जण जखमी झाले होते. जखमींमध्ये विद्यार्थी, संघटनांचे नेते आणि शिक्षकांचाही समावेश आहे. या हिंसाचारात विद्यापीठाच्या अनेक दालनांची मोडतोड झाली. जेएनयू स्टुडन्ट्स युनियन आणि संघ परिवारातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांनी या हिंसाचाराचे खापर परस्परांवर फोडले व त्यात आपले अनेक सदस्य जखमी झाल्याचा दावा केला आहे.  

दरम्यान,  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या  हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते, मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही झालेल्या प्रकारावर टीका केली आहे. राहुल गांधी, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.  

Web Title: BJP leader Ashish Shelar has criticized Minister Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.