शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:27 PM2021-08-19T19:27:43+5:302021-08-19T19:27:53+5:30

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

BJP leader Ashish Shelar has criticized Shiv Sena | शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे; नौटंकी करू नका, भाजपाचा घणाघात

googlenewsNext

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राज्यात नवा राजकीय वाद उभा राहण्याची शक्यता आहे. 

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणाऱ्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती आहे, महाराष्ट्राच्या संस्कृतीची झाली आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकलं. त्या छगन भुजबळांसोबत सत्ता स्थापनेसाठी बसायचं. स्वत:च्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन केलं आहे. या शिवसेनेचं शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. शुद्धीकरणाच्या नावाने नौटंकी करू नये, असा घणाघात देखील आशिष शेलार यांनी केला आहे. 

नारायण राणे यांची आज मुंबईत जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. मुंबई विमानतळावरून सुरू झालेल्या यात्रेनंतर राणेंनी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यानंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. "साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी नक्कीच मला आशीर्वाद दिला असता आणि म्हणाले असते नारायण तू असाच पुढे जात राहा. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्यासोबत आहेत असं मी समजतो", असं नारायण राणे म्हणाले. 

मुंबई मनपा जिंकणं ही माझी जबाबदारी-

मुंबई महानगरपालिका भाजपाच जिंकणार असून ती जिंकून देणं ही माझी जबाबदारी आहे. माझ्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेत्यांचीही ती जबाबदारी आहे. यावेळी पालिका निवडणुकीत तुम्ही भाजापाची सत्ता आलेला पाहाल, असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला. 

राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, कालिदास कोळंबकर, प्रसाद लाड यांच्यासह राणेंचे सुपुत्र निलेश राणे देखील उपस्थित आहेत. मुंबई विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांनी राणेंचं स्वागत केल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर प्रवीण दरेकर आणि शेलारांसह राणे मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादर परिसरात जनआशीर्वाद यात्रा करत आहेत. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Web Title: BJP leader Ashish Shelar has criticized Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.