मुंबई: अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संघर्षाचे पडसाद गुरुवारी मुंबईतील समूह विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी पाहायला मिळाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर आता भाजपाकडून निशाणा साधण्यात आला आहे.
भाजपाचे नेते आशिष शेलार ट्विट करत म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात परिक्षांपेक्षा शिक्षण महत्त्वाचे पण शाळा कशा व कधी सुरु होणार माहित नाही. अंतिम वर्षे पदवी परिक्षा रद्द, पण अद्याप लेखी आदेश नाही. त्यामुळे विद्यापीठांत परिक्षांची तयारी सुरु असं आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे परिक्षा रद्द केल्याचे जाहीर करतात. तर वैद्यकीय शिक्षणमंत्री परिक्षा घ्या, म्हणून राज्यपालांना भेटतात. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया म्हणते परिक्षा घ्यावीच लागेल, असं ट्विट आशिष शेलार यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिक्षणाचा असा “गोंधळात गोंधळ” असल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
पदवी अंतिम वर्षाला सरासरीवर गुण देऊन तब्बल 40% म्हणजे ATKT असलेल्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थी नापास करण्याचे हे षडयंत्र आहे का असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. कोरोनामुळे भयभीत विद्यार्थी, पालकांचा धोक्यात आलेला नोकरी-धंदा त्यामध्ये सरकारचा गोंधळ यामुळे विद्यार्थी तणावत असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आता तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी सरकारचे संकटमोचन शिवसेनेचे नेते संजय राऊत तुम्हीच धावून या, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची घोषणा केली होती. मात्र अंतिमच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची की नाही ते विद्यापीठ कायद्याच्या आधारे ठरवलं जाईल. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेताना कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे,' असं म्हणत राज्यपाल कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती.