Join us

अंधेरीत झाले, ते बरे झाले; आशिष शेलारांनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या विजयाचं गणित!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 12:32 PM

अंधेरीच्या पोटनिवडणुकीमुळे ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला आहे, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलारांनी केली आहे.

मुंबई- भाजपाने माघार घेतल्यानंतरही चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी ६६,५३० मते मिळवून विजय मिळवला. त्यांच्या विजयामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला बळ मिळाले आहे. 

विशेष म्हणजे या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच १२,८०६ मते 'नोटा'ला मिळाली. मागील वेळेपेक्षा कमी मतदान होऊनही आपले पती दिवंगत आमदार रमेश लटके यांच्यापेक्षा ऋतुजा लटके यांनी जास्त मते मिळवली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह गोठवले याचे दु:ख आहे. मशाल चिन्ह मिळाले. मशाल भडकली आणि भगवा फडकला, असं ऋतुजा लटकेंच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. तसेच आगामी मुंबई महानगरपालिकेचं गणित देखील समजावून सांगितलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीने बरेच काही स्पष्ट केलं आहे. मतदानाची अत्यल्प टक्केवारी आणि नोटा यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावरचा मुंबईकरांचा रोष समोर आला. तसेच तिघाडीला ७० टक्के मतदारांनी नाकारले, असं आशिष शेलार म्हणाले. २०१४ नुसार विचार केला तर आघाडीच्या उमेदवारांना ९० हजार मते मिळायला हवी होती तसे घडले नाही. एक पक्ष दुसऱ्या पक्षाला मतदान करत नाही, असंही आशिष शेलारांनी सांगितले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संभ्रमावस्थेत असलेल्या शिवसैनिकांत चैतन्य पसरले. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी वांद्याची वाट धरली. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावरील पोलिसांची पोलिसांची सुरक्षा आणि भेटीसाठी येणाऱ्यांची गर्दी कमी दिसत असे. मात्र रविवारी वर्दळ वाढली होती. 

'…तरी पाळणा रिकामाच राहणार'- उद्धव ठाकरे

ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील. मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत, असा इशारा आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

टॅग्स :उद्धव ठाकरेआशीष शेलारभाजपाशिवसेना