Join us

भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित-वंचित आघाडी; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 1:32 PM

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला.

मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांसाठी सोमवारी युतीची घोषणा केली. देशाची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्यासाठी, देश प्रथम हे उद्दिष्ट समोर ठेवून एकत्र येत आहोत, असे दोन्ही नेत्यांकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंती दिनी जाहीर करण्यात आले.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. कुणीतरी खरंच म्हटलं आहे किंचित आणि वंचित एकत्र आले आहेत हे सुध्दा त्यांचे लिव्ह इन रिलेशन आहे. आमच्या भीतीपोटी त्यांची पळापळ होते आहे हे स्पष्ट दिसत आहे म्हणून उद्धव ठाकरे मराठी मुस्लिम करत मुस्लिमांच्या मागे लागतात. मग कधी वंचितच्या मागे लागतात. आमच्या भीतीने होणारी पळापळ म्हणजे किंचित आणि वंचित यांची आघाडी आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

राज्यपालांवर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले, त्यांनी मोर्चा काढला होता त्याचे काय झाले? त्यांनी आंदोलन केले होते. जनतेने त्यांना पाठिंबा दिला नाही. त्यामुळे एका संवेदनशील मनाचं प्रतिनिधित्व स्वतः राज्यपाल यांनी केले आहे. ते आज स्वतःच जाऊ इच्छितात म्हटल्यावर त्याच्यावर क्रेडिट घेण्याचा धंदा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे हे वाक्य असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितले.

दरम्यान, आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांना इंग्रजी तरी येते का? त्यांनी इंग्लिशमध्ये एखादे वाक्य बोलून दाखवावे. एखादे भाषण करून दाखवावे. त्यामुळे स्वतःला जमत नाही त्याबाबत दुसऱ्याला दिशादर्शन करणे हे काही बरोबर नाही. मी, आज त्यांना विचारणार नाही की, उद्धव ठाकरे इंग्लिशमध्ये बोलू शकतात का? पण मुद्दा असा आहे की, जे स्वप्नामध्ये बायडन आणि कृशोवला भेटतात त्यांना सगळेच स्वप्नामध्ये भेटतात असे वाटत असेल. दावोसमधील करारामध्ये झालेले आकडे बघून त्यांचे डोळेही दिपले आणि बोबडी वळली म्हणून असे हास्यास्पद संजय राऊत बोलतात, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.

...म्हणून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले नाहीत-

मला वाटते हा कार्यक्रम अराजकीय होता. त्यांच्याही पक्षाचे लोक होते. उद्धव ठाकरे स्वतः आले नाहीत. ते स्वतः मात्र अन्य पक्षांच्या राजकीय नेत्यांबरोबर गुलूगुलू करत होते. याचा अर्थ ते केवळ मतांचे राजकारण पाहत आहेत. एका विशिष्ट वर्गाची मतं बाळासाहेबांच्या भगवाधारी तैलचित्राचे अनावरण केल्यानंतर मिळतील की, नाही यासाठी एका विशिष्ट गटाच्या मताचं लांगुलचालन करण्यासाठी उद्धव ठाकरे कार्यक्रमाला आले नाहीत असा आमचा कयास आहे.

टॅग्स :आशीष शेलारउद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकर