मुंबई- भाजपा मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच आशिष शेलार यांनी वरळीतील जांबोरी मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या खेळीने आशिष शेलार यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचे सांगितले जात आहे. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आशिष शेलार महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वरळीतील कोळी बांधवांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत.
भाजपाच्या या आयोजनावर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. वरळी सर्वांना आवडली आहे. सगळ्यांनी सण साजरा करावा. कुठेही दहिहंडी साजरी करावी. मात्र कार्यकर्त्यांची मारामारी व्हावी, अशी आमची भूमिका नाही, असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर आज आशिष शेलार यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाकडून मुंबईभर दहिहंडीचे कार्यक्रम करणार आहेत. आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करावं. जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाचे नेते मोहित कंबोज यांची ट्विट खरी ठरली आहेत. त्यांच्या ट्विटचा अर्थ खोल आहे, असंही आशिष शेलार यांनी यावेळी म्हटलं.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून 'स्थगिती सरकार हाय हाय' अशा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे. हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभा आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.