"ई- भूमीपूजन करा म्हणणारे कोकणच्या चाकरमान्यांना अद्याप "ई-पास" देऊ शकले नाहीत”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 08:00 PM2020-08-03T20:00:50+5:302020-08-03T20:09:36+5:30
आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबई - ई- भूमीपूजन" करा म्हणणारे आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना अद्याप "ई पास" देऊ शकले नाहीत. त्यामुळे ई- दलालांचा सुळसुळाट झालाय त्यांची चौकशी करा. चाकरमान्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करणार होते एसटीच्या गाड्या सोडणार होते..कधी? कोकणी माणसाचा अंत पाहू नका असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
याबाबत आशिष शेलार म्हणाले की, आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा.त्यांना सुरक्षित सन्माने कोकणात जाण्यासाठी परवानगी द्या. तातडीने निर्णयाची घोषणा करा. सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली.
तसेच मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन करताना त्यांनी म्हटले आहे की,गणेशोत्सव मंडळांनो ऐका! "कोरोनामुळे उत्सव साजरा करण्याची बदललेली पद्धत गवसली आहे. हे कोरोनाचे सकारात्मक फलित" आहे असे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत. "गणेशोत्सवावरील बंधने कायमस्वरूपी फक्त यावर्षी कोरोनामुळे सवलत, पुढच्या वर्षी मिळणार नाही. असे राज्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सांगत आहेत. याच सामाजिक कार्यकर्त्यांच्या याचिकेमुळे गतवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव अडचणीत आला होता. तत्कालीन मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही हा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलो आणि जिंकलो. आजचे सत्ताधारी तेव्हा कुठेच नव्हते.आता दुर्दैवाने पुन्हा उत्सवाबाबत चिंता वाटतेय असं आशिष शेलार म्हणाले.
दरम्यान, गणेशोत्सव मंडळांनो, त्यांच्या बोलण्याचा गर्भित अर्थ समजून घ्या. पालिका स्वतःहून परवानग्या देत नाही. पण तुम्ही परवानगी घेऊन ठेवा. कोरोनामुळे बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करायची की नाही, हा निर्णय तुमचा..सरकार “बोटचेपी” भूमिका घेतेय. गणेशोत्सवावर यापुढे विघ्न नको..सावध राहा असे आवाहन त्यांनी केले आहे.