मुंबई – विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका रातोरात स्थगित केल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. १८ तारखेपासून सिनेट निवडणुकीसाठी अर्ज भरायचे होते. परंतु १७ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री उशीरा विद्यापीठाने पत्रक काढून निवडणुकीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आल्याचे जाहीर केले. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यसह इतर संघटनांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
त्यात आता युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी विद्यापीठातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर सरदेसाई यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. वरुण सरदेसाई म्हणाले की, रात्री साडे अकरा वाजता विद्यापीठाने निवडणुकीला स्थगिती दिल्याचे जाहीर केले. आम्ही विद्यापीठ प्रशासनाला भेटायला आलो. याठिकाणी छावणीचं रुप आले होते. शेकडो पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही आम्ही आतमध्ये जाऊन चर्चा केली. त्यावेळी लक्षात आले की, भाजपाची विद्यार्थी आघाडी ABVP आणि भाजपा आमदार आशिष शेलारांनी पत्र दिलं होते. त्यात काही नावांची दुबार मतदार नोंदणी झाली आहे असा आरोप केला. या पत्रामुळे एका मिनिटात या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असा आरोप युवासेनेने केला.
त्याचसोबत मतदार नोंदणीची सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन झाली होती. साडे तीन महिन्यापासून ही नोंदणी सुरू होती. तेव्हा काही संघटनांनी कोर्टात धाव घेत ही नोंदणी ऑफलाईनही घ्यावी अशी मागणी केली. तेव्हा विद्यापीठाने कोर्टात प्रतिज्ञापत्र देत म्हटलं की, ऑनलाईन प्रक्रिया ही सुरक्षित आहे. त्यात कुठलीही दुबार नोंदणी होऊ शकत नाही. यामध्ये कुठे चुका होऊ शकत नाही असं कोर्टाला सांगितले. त्यानंतर साडे तीन महिन्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती असंही वरूण सरदेसाई यांनी सांगितले.
दरम्यान, विद्यापीठाने चर्चेत अंतिम यादीत बिघाड नाही असं म्हटलं आहे. आता शासन आणि विद्यापीठ यांच्यातील ही बाब आहे. अनेक संघटना या निवडणुकीत इच्छुक होते. प्रचंड गोंधळ हा एका पत्रामुळे झाला आहे. आज आम्ही १० अर्ज दाखल केले आहेत. जेव्हा कधीही निवडणूक जाहीर होईल तेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ आणि १० जागा जिंकू. जर निवडणूक वेळेवर झाली नाही तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पत्रकार परिषद घेऊ जनतेला संबोधले पाहिजे. निवडणूक स्थगित करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे असंही युवासेनेचे वरुण सरदेसाई यांनी म्हटलं आहे.