मुंबई: राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरी सकाळीच ईडीचे अधिकारी पोहोचले. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी नवाब मलिक यांना अटक केली. यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. नवाब मालिकांना अपेक्षेप्रमाणे अटक झाली आहे. ईडीची कारवाई योग्य दिशेने सुरू आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दाऊद कनेक्शन नक्कीच उघड होईल. बरेचजण गोत्यात येतील, असा दावा भातखळकर यांनी केला आहे. यापूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्याचा टोलाही भातखळकर यांनी लगावला होता.
करावे तसे भरावे, कायदा सर्वोच्च असल्याचे पुन्हा दिसले
अतुल भातखळकर यांच्यासह भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, करावे तसे भरावे. देशात कायदा सर्वोच्च आहे. कोणत्याही पक्षाचा मंत्री, नेता या कायद्यापुढे मोठा नाही आणि हेच यातून दिसून आले. कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. नवाब मलिकांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करणे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे वाटले असेल. केंद्रीय तपास यंत्रणा, ईडी विनाकारण कुणालाही त्रास देत नाही, असे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीने बेकायदेशीरपणे कारवाई केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आरोपच बेकायदेशीर आहे. ईडीने कायद्याला धरून कारवाई केली नाही असे वाटत असेल, तर न्यायालयात त्याबाबत दाद मागावी. या देशात कोणावरही बेकायदेशीरपणे कोणतीही कारवाई करता येत नाही. राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक झाल्यामुळेच सुडाचे राजकारण वगैरे टीका करण्यात येत असल्याचे दरेकर यांनी सांगितले.
दरम्यान, नवाब मलिक यांना अटक झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते.