Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जोरदार खडाजंगी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच जायकवाडी धरणावर एक हजार मेगावॉटचा आणि १० हजार कोटींची गुंतवणूक असलेला फ्लोटिंग सोलर पॅनल प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने नाकारल्याचा आरोप केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केला. यानंतर आता भाजपनेही तत्कालीन पर्यावरण, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
तत्कालीन उद्योग व जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना या प्रकल्पाबाबत पत्र पाठवूनही त्यांनी ‘जायकवाडी’वर सोलर बसू शकत नसल्याचे कळविल्याचा दावाही कराड यांनी केला. शिंदे- फडणवीस सरकारने मात्र हा प्रकल्प मनावर घेतले आहे. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तातडीने एनओसी दिली, असे भागवत कराड यांनी सांगितले. यावरूनच भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे.
आता धृतराष्ट्र जागे झाले अन् प्रकल्प गेल्याचा पोकळ ओरडा करतायत
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरे यांनी मुंबई मेट्रो कारशेड प्रकल्पात जशी पाचर मारली तोच प्रकार जायकवाडी येथील फ्लोटींग सोलार प्रकल्पाबाबत केला. अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यासाठी प्रयत्नशील होते. राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने हा विकास विरोधी निर्णय फिरवला आहे. फक्त टक्केवारीची दृष्टी असलेल्या मावा आघाडीच्या काळात उद्योग आणि विकासाला खीळ बसली होती. आता धृतराष्ट्र जागे झाले आहेत आणि प्रकल्प गेल्याचा पोकळ ओरडा करतायत, तेही पुराव्यांशिवाय. जनता या फांदेबाजांना गाडण्यासाठी फक्त निवडणुकांची वाट पाहते आहे, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
दरम्यान, जायकवाडीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, मराठवाड्यातील कोणत्याही प्रकल्पाला मी नकार दिलेला नाही. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी खोटे बोलणे बंद करावे. या प्रॉजेक्टबाबत कराड यांनी फक्त पत्र लिहिले होते पण सरकार पत्रावर चालत नाही. केंद्राच्या ‘एनटीपीसी’कडून प्रस्ताव यायला हवा होता मात्र कराड यांनी राज्यसरकारकडे पत्र दिले. केंद्रीय मंत्री असल्याने आम्ही त्यांच्या पत्राची दखल घेतली व एक समिती गठित केली. एप्रिलच्या शेवटी पत्र आले आणि जूनच्या सुरुवातीला आम्ही समिती गठित केली. त्यामुळे प्रकल्प घालविला हे सांगणे चुकीचे आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"