मुंबई: आरे कारशेडवरून शिवसेना आणि भाजपतील संघर्ष वाढत असतानाच मुंबई मेट्रो-३ ची ट्रायल रन अखेर आरेतील सारीपूतनगर येथे पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत मेट्रो-३ च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यानंतर भाजप नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन करताना मागील महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारला शुभेच्छा देताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. पुनश्च हरिओम एका स्वप्नाचा... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस, MMRCL च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीचा शुभारंभ पार पडला. अंधार आणि अहंकाराच्या अडीच वर्षानंतर पुन्हा अवतरले विकासाचे युग, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले. तत्पूर्वी या चाचणीवेळी एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
सर्व राजकीय प्रदूषण बाद झाले आहे
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होत आहे. पण बाप्पा येण्याआधीच मुंबईकरांसमोरील मोठे विघ्न दूर झाले आहे. आता मेट्रो-३ च्या कामात कोणतेही विघ्न येणार नाही. सर्वसामान्य जनतेचा फायदा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चरबाबत सकारात्मक निर्णय घेणारे हे सरकार आहे. मेट्रो-३ ही मुंबईकरांची नवी लाइफलाइन ठरणार आहे. त्यामुळे जनतेच्या फायद्याचा निर्णय घेणारे सरकार आले आहे. या मेट्रोमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होईल असा कांगावा केला गेला. पण आता सर्व राजकीय प्रदूषण बाद झाले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.
दरम्यान, पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच जबाबदारी आहे आणि याची सर्वांनाच काळजी आहे. काही विशिष्ट लोकांनाच याची काळजी आहे असे नाही. मी आता या ठिकाणी आलो तेव्हा पाहिले याठिकाणी तिन्ही बाजूंनी रस्ते आहेत. ज्यापद्धतीने पर्यावरणाच्या ऱ्हासाचा दावा केला गेला तसे काहीच झालेले नाही आणि देशाचे सर्वोच्च न्यायालय देखील देशातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने निकाल देत असते. मेट्रो-३ मुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. लोकल ट्रेनमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक त्रासून प्रवास करतात. तसंच गर्दीला कंटाळून लोकांनी स्वत:ची वाहने घेण्याचा सपाटा लावला. पण आपल्याला राज्यातील सार्वजनिक वाहतूक भक्कम करायची आहे. जेणेकरुन लोकांना त्यांची वाहने बाहेर काढावी लागणार नाहीत.