मर्यादित काळासाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय दिशाहीन, हास्यास्पद; भाजपा नेत्याची टीका
By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 05:46 PM2021-01-29T17:46:55+5:302021-01-29T17:54:28+5:30
राज्य सरकारनं १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सर्वांना प्रवासाची दिली मुभा
अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांसाठी बंद असलेली रेल्वे आता सुरू करण्यचाा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. परंतु सर्व प्रवाशांना ठराविक वेळेतच प्रवास करता येणार आहे. दरम्यान, यावरून आता भाजपानं राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी सरकारचा हा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद असल्याचं म्हणत राज्य सरकारवर टीका केली.
"मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी सूरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी हा निर्णय केवळ धूळफेक असून सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत लोकलची खरी आवश्यकता असते. केवळ रात्री व दुपारी प्रवासाची मुभा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अत्यंत हास्यास्पद व निरर्थक आहे," असं भातखळकर म्हणाले.
"कोरोनामुळे लोकल बंद करून आज १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. एकीकडे सर्वसामान्यांसाठी लोकल पुन्हा सुरू केल्यास कोरोना वाढेल असे कारण देणाऱ्या ठाकरे सरकारने दुसरीकडे मात्र मद्यविक्रीची दुकाने, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, बाजारपेठा, बसेस, शाळा-कॉलेज, लग्न समारंभ, राजकीय पक्षाच्या सभा आदी सर्व सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मुंबईतील उपनगरे व शेजारील शहरांमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, त्यातही पूर्व व पश्चिम महामार्गावर होत असलेल्या प्रचंड वाहतूककोंडी मुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांसाठी सर्वाधिक आवश्यक असणारी लोकल पूर्ण क्षमतेने सुरू होईल अशी अपेक्षा होती. परंतु कायमच आपल्या दिशाहीन निर्णयासाठी प्रसिद्ध असलेल्या या सरकारने पुन्हा एकदा मुंबईतील सर्वसामान्य चाकरमान्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्याचेच काम केले आहे," टीकाही त्यांनी केली.
... तर आंदोलन करणार
राज्य सरकारने अहंकार बाजूला ठेऊन सर्वसामान्यांसाठी तात्काळ लोकल सुरू करावी, अन्यथा भारतीय पक्षा तर्फे मोठे जनआंदोलन केले जाईल, असा इशारादेखील भातखळकर यांनी दिला आहे.