"मुंबई-मागील पंचवीस वर्षाच्या काळात केलेला भ्रष्टाचार व मुंबईला खड्ड्यात घालण्याचे केलेले काम यामुळे आपला पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. यामुळे भयभीत होऊन निवडणूक तोंडावर असतांना मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा रडीचा डाव हे ठाकरे सरकार खेळत आहे," अशी टीका भाजप मुंबई प्रभारी व आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री महोदय काहीही केलत तरी मुंबईत येणार तर फक्त भाजपच असा टोला देखील त्यांनी लगावला.
"सत्तेचा दुरुपयोग करून व सर्व नियम धाब्यावर बसवून प्रभागांची पुनर्रचना करण्याचा ठाकरे सरकारचा डाव निवडणूक आयोगाच्या कठोर भूमिकेमुळे शक्य होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे आता नगरसेवकांची संख्या वाढवायची आणि त्यातून आपल्यासाठी पोषक ठरतील अशी प्रभागांची पुनर्रचना करायची असा प्रकार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे," असं भातखळकर म्हणाले.
"परंतु ठाकरे सरकारचा भ्रष्टाचारी व वसूली पॅटर्न मुंबईच्या जनतेने चांगलाच ओळखला आहे, त्यामुळे शिवेसेनेच्या अकार्यक्षमतेचा भोपळा आगामी निवडणुकीत मुंबईची जनता नक्की फोडणार," असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.