मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावर बुधवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर चौफैर हल्ला केला. यावेळी आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या शाब्दिक बाणांच्या निशाण्यातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सुटले नाही. विधिमंडळात शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर घणाघात केला. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला की पळे, असा टोला उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray in Vidhan Sabha) यांनी लगावला होता.
उद्धव ठाकरेंच्या या विधानावरुन विरोध चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, "चीनसमोर पळ काढे" असे निलाजरे विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत. जवानांचा अपमान केल्या बद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी, असं म्हणत जनता या 'राहुल गांधीगिरी'चा समाचार घेईलच, असा इशारा देखील दिला आहे.
तत्पूर्वी, विरोधी पक्षाने शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. आमचं सरकार शेतकऱ्यांसोबत आहेच. मात्र दिल्लीच्या सीमेवर जे शेतकरी आंदोलन करत आहे. त्यांना दिल्लीत येता येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. ज्या तारांचं कुंपण देशाच्या सीमेवर टाकले पाहिजे, ते राजधानीच्या रस्त्यावर टाकले आहे. मात्र चीनसमोरून मात्र या सरकारने पळ काढला. शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे आणि चीन दिसला की पळे, अशी यांची अवस्था आहे. देश ही तुमची खासगी मालमत्ता नाही, तसेच महाराष्ट्र तर नाहीच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसाल तर भारत माता की जय म्हणण्याचाही अधिकार तुम्हाला नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात केला होता.
आमच्या हिंदुत्वावर शंका घेऊ नका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उसने अवसान आणून बोलले. सत्य काय ते त्यांना माहिती आहे. खोटं बोला पण रेटून बोला हे मुख्यमंत्र्यांचे नवे रुप बघायला मिळाले असे फडणवीस म्हणाले. शिवसेना स्वातंत्र्याच्या लढ्यात नव्हती हे मुख्यमंत्री म्हणाले पण सोबतच त्यांनी रा. स्व. संघाचा उल्लेख केला. संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार हे स्वत:च स्वातंत्र्यसैनिक होते.
आमच्या हिंदुत्वावर शंका घेणारे मुख्यमंत्री हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशद्रोही आणि समलैंगिक म्हणणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, हे कुठले हिंदुत्व, असा सवाल फडणवीस यांनी केला. हिंदुंचा अपमान करणाऱ्या शर्जिल उस्मानीची उत्तर प्रदेशात हिंदुंविरुद्ध गरळ ओकण्याची हिंमत झाली नाही, त्यासाठी तो महाराष्ट्रात येऊन बोलला, अशी टीका त्यांनी केली.
फेसबुक लाईव्हवरील टीकेला उत्तर
मी कोरोना काळात फेसबुक लाईव्ह करतो होतो. या फेसबुक लाईव्हरील फीडबॅकमधून मिळालेल्या माहितीनुसार, याच फेसबुक लाईव्हमुळे महाराष्ट्रातील जनता मला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य मानायला लागली, हीच माझी आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. फेसबुक लाईव्हमधून मी महाराष्ट्राच्या जनतेच्या घरात पोहोचलो, नागरिकांना धीर मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तसेच कोरोना काळातील घोटाळा आणि आरोपांवरील टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. हा व्हायरस आहे, तो व्हायरस म्हणाला मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन आणि कोरोना व्हायरस पुन्हा आला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सभागृहातच टोला लगावला.