मुंबई- राज्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन आठ हजार मेगावॅट औष्णिक वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवून तातडीच्या उपाययोजना करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
वीज टंचाईवर मात करण्यासाठी दीर्घकालीन व तात्कालिक अशा दोन्ही उपाययोजना करा. विजेसंदर्भात जे निर्णय घेतले जातील, त्याच्या अंमलबजावणीचा आपण दर आठवड्याला आढावा घेऊ. आधीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाईल, असे मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या या निर्देशानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. कोळशासाठी राज्याची धावाधव सुरू असून महानिर्मितीकडे फक्त साडेतीन दिवसांचा साठा असल्याची बातमी आहे.तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? नियोजन शून्य आणि गलथान कारभार हीच महाविकास आघाडी सरकारची ओळख आहे. आमचा कोळसा केंद्राची जबाबदारी या तत्त्वामुळे हे सरकार निर्धास्त आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
पाच दिवसांपासून भारनियमन नाही- ऊर्जामंत्री राऊत
ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले की, राज्यात भारनियमन करावे लागू नये म्हणून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश मिळत असल्याचे व पाच दिवसांपासून भारनियमन करण्यात आलेले नाही. एकट्या महाराष्ट्रातच नाही, तर देशात विजेची टंचाई आहे.
कोळशाचा अपुरा पुरवठा हे त्यामागचे मुख्य कारण असून, इतर १२ राज्यांतही कोळशाअभावी भारनियमन सुरू आहे. दरदिवशी २५०० मेगावॅट विजेचा तुटवडा आहे. विभागाने २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. महावितरणच्या स्तरावर चार लाख मेट्रिक टन कोळसा आयात करण्याचे कार्यादेश दिले आहेत.