Join us

कोरोना चाचणी नसल्यामुळे राज ठाकरेंना विधान भवनात प्रवेश नाकारला, पण...; भाजपाचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 9:22 AM

२५ आमदारांना कोरोना चाचणी नसल्यामुळे विधान भवनात प्रवेश नाकारला.

मुंबई:  दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. डेलकर यांनी आत्महत्या करताना लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही नेत्यांच्या नावांचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत होते. याचपार्श्वभूमीवर मंगळवारी विधान भवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. 

मोहन डेलकर यांच्या कुटंबीयांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आम्हाला केंद्र सरकारने मदत केली नाही. मात्र आता महाराष्ट्र सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्याकडून या प्रकरणाचा योग्य तपास होईल, अशी अपेक्षा मोहन डेलकर यांच्या पुत्राने व्यक्त केली. तसेच या मोहन डेलकर यांना गेल्या १६ महिन्यांपासून प्रचंड त्रास देण्यात येत होता. या मानसिक त्रासामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र उद्धव ठाकरेंनी मोहन डेलकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानं भाजपाने निशाणा साधला आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, २५ आमदारांना कोरोना चाचणी नसल्यामुळे विधान भवनात प्रवेश नाकारला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना देखील कोरोनाची चाचणी नसल्यामुळे प्रवेश दिला नाही. मात्र मोहन डेलकर कुटुंबियांना भेटलात हे उत्तम, असं म्हणत नियम सर्वांना सारखेच हवेत, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, कोरोनाचा पुन्हा वाढलेला संसर्ग, वीजबिल तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक आहेत. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी २ मार्च रोजी विधान भवनात येत होते. मात्र विधान भवनाच्या आवारात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असणे अनिवार्य करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी कोरोनाची चाचणी केलेली नव्हती. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट न घेताच विधान भवनाच्या आवारातून माघारी फिरले होते.   

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभाजपामनसेउद्धव ठाकरेविधान भवनमहाराष्ट्र सरकार