मुंबई: पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये शहर काँग्रेसने सुरू केलेल्या विनामूल्य छत्री दुरूस्ती उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसच्या विनामूल्य छत्री दुरूस्तीची समाजमाध्यमांवर बरीच टर उडवली गेली. ७० वर्षांच्या कारभारानंतर आलेली वेळ, आता भाजपाची काही धडगत नाही अशा आशयाच्या पोस्ट केल्या गेल्या. त्यात अर्थातच भाजपा समर्थक आघाडीवर होते.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी देखील आता ट्विट करत काँग्रेसला टोला लगावला आहे. Nerd faceFace with tears of joyGrinning face with smiling eyes, असं म्हणत सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा, अशी टीका त्यांनी केली. तसेच या होर्डिंगच्या किंमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या, असा टोला देखील अतुल भातखळकर यांनी काँग्रेसच्या या उपक्रमावर लगावला आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी यांनी काँग्रेस भवनमध्ये पक्षाच्या वतीने सुरू केलेल्या या अभिनव ऊपक्रमाला सोमवारी दुपारी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या ऊपस्थितीत सुरूवात झाली. मोघे म्हणाल्या, कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एकमेकांना मदतीचा हात देत, बरोबर राहूनच या संकटावर मात करणे शक्य आहे, म्हणूनच काँग्रेसचे हे पाऊल महत्वाचे आहे.
जोशी यांनी सांगितले की, १९ जूनपर्यंत रोज सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात नागरिकांना त्यांची छत्री विनामूल्य दुरूस्त करून देण्यात येईल. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांना हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे असे जोशी म्हणाले.