उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद; दोघांमागील 'तो' बॅनर अन् भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 03:57 PM2023-01-23T15:57:45+5:302023-01-23T15:58:35+5:30
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- सध्या राजकारणात काही वाईट परंपरा, चाली सुरू आहेत. त्यावर आघात करण्यासाठी ठाकरे-आंबेडकराची पुढची पिढी वारसदार एकत्र येऊन देश प्रथम या उद्दिष्टावर काम करणार आहोत असं सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा मुंबईत करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेला भ्रमात ठेऊन हुकुमशाहीकडे वाटचाल केली जातेय. नको त्या वादात अडकवून आपले इच्छित साधायचं. देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, घटनेचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. तळागाळातील जनतेपर्यंत जे काही सुरू आहे ते पोहचवण्याची गरज आहे. निवडणुका आल्यावर गरिबांचा उदोउदो करायचा. निकालानंतर गरीब रस्त्यावर आणि यांची उड्डाणे सुरू होतात त्यासाठी आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले. भाजपाने मात्र या युतीवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेत लावलेल्या बॅनरवरुन टोला लगावला आहे. वंचित बहुजन आघाडी वर आणि खाली शिवसेना…काय दिवस आलेत... ही सगळी उद्धव ठाकरेंच्या खंजीराची करणी आहे, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी वर आणि खाली शिवसेना… काय दिवस आलेत यांना. ही सगळी उद्धव ठाकरेंच्या खंजीराची करणी आहे. pic.twitter.com/QeRNTinx57
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 23, 2023
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी-शिवसेना यापुढे एकत्रित निवडणूक लढवतील. गेली अनेक वर्ष उपेक्षितांचे राजकारण सुरू व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केला. जी चळवळ आम्ही चालवत होतो तिला आमच्याच मित्रपक्षाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आंदोलन करत राहिलो, लढत राहिलो. जिंकून आणणं हे मतदारांच्या हाती आहे. ते राजकीय पक्षाच्या हातात नाही. मात्र उमेदवारी देणे राजकीय पक्षाच्या हाती आहे. नातेवाईकांचे राजकारण जसं जसं वाढत गेले तसे गरीबांचे राजकारण बाजूला पडत गेले. भांडवलशाहीचे, लुटारुंची अशी सत्ता सुरू झाली. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अॅड. प्रकाशजी आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद । आंबेडकर भवन, दादर - LIVE
♦️ सोमवार - २३ जानेवारी २०२३ https://t.co/1gQbxwRhhp#UddhavThackeray#PrakashAmbedkar#PC— Shivsena Communication (@ShivsenaComms) January 23, 2023
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"