मुंबई: जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. मात्र वसतिगृहातील कथित घटनेसंदर्भात सहा वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली असून, तेथे कोणतेही गैरकृत्य घडले नसल्याचा निष्कर्ष समितीने अहवालात काढला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, जळगावातील कथित घटनेसंदर्भात विविध खात्यांतील सहा महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वसतिगृहातील सर्व १७ महिलांशी चर्चा केली. ४१ जणांच्या साक्षी नोंदविल्या आहेत. समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे.
तक्रारदार महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे निदर्शनास आले आहे. महिला वसतिगृह असल्याने तिथे पुरुष अधिकारी आत जाऊ शकत नाही. पोलिसांनी त्या कथित घटनेचा व्हिडीओ काढला असे सांगितले जात असले तरी असा कोणताही व्हिडीओ पुरावा म्हणून समितीला मिळाला नाही, असेही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. मात्र अनिल देशमुख यांच्या या खुलासाबाबत भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.
जळगाव महिला वसतिगृहाच्या गैर प्रकाराबद्दल महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे, असं अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे सांगितले. तसेच मी म्हणालोच होतो ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत, असं सांगत ठाकरे सरकारला टोला देखील लगावला आहे.
बदनामी नको
शासकीय वसतिगृहात पीडित आणि घटस्फोटित महिला राहतात. त्यांच्यासंदर्भात अशा प्रकारे बदनामीकारक माहिती प्रसारित करणे योग्य नाही. जळगावातील आशादीप वसतिगृह महिला व बालविकास विभागामार्फत चालविले जाते. ज्या महिलेने तक्रार केली, तिची मानसिक स्थिती ठीक नाही, असे या खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले.