Join us

'राज्यात १०० आमदार जिंकून आणण्याचे पक्षाचे वांदे, अन्...'; भाजपाचा आदित्य ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 16:02 IST

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

मुंबई: शिवसेना भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. गोव्यात शिवसेनेला सकारात्मक वातावरण आहे.त्यामुळे गोव्यातील राजकारणात पक्ष अधिक सक्रियपणे उतरेल असे महाराष्ट्राचे शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच  प्रत्येक राज्यात लोकसभा ते ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा देखील आदित्य ठाकरे यांनी गोव्यात केली. 

आदित्य ठाकरेंच्या या विधानानंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे. अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, आदित्यजी आधी वांद्र्यातून शिवसेनेचा आमदार तर निवडून आणून दाखवा. राज्यात १०० आमदार जिंकून आणण्याचे तुमच्या पक्षाचे वांधे, जेवढे आहेत ते राहतील की नाही याची मारामार... तरीही तुमचा आत्मविश्वास कौतुकास्पद आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेची युती होती. सदर युती चांगल्या पद्धतीने पुढे जावी अशी अपेक्षा होती. शिवसेनेकडून युती पुढे नेण्याचा प्रयत्नही झाला. भाजपला अडचण होऊ नये यासाठी शिवसेना गोव्यातील राजकारणात फारशी सक्रिय नव्हती. मात्र शिवसेच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळेच आता शिवसेना गोव्यातील सक्रिय राजकारणात उतरत आहे. मणिपूर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, मणिपूर, सिलवासा येथे सुद्धा शिवसेनेने उमेदवार उभे केल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

आम्हाला प्रचार करु द्या की...- आदित्य ठाकरे

"गोव्यात मागील दहा वर्ष भाजपचे सरकार आहे. केंद्रातही भाजपाचेच सरकार आहे. मात्र राज्यात शाश्वत विकास होऊ शकला नाही. महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष केले गेले. पर्यटनाबरोबरच गोव्यात बेरोजगारी सुद्धा वाढत आहे. निवडणुकीत शिवसेनेचे डिपोझिट जप्त होईल अशी टीका केली जात आहे. जर आमचे डिपोझिट जप्त होणार आहे, तर मग कशाला घाबरतात, आम्हाला प्रचार करु द्या की," असे ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. यावेळी शिवसेना गोवा प्रभारी तथा खासदार संजय राऊत व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर हजर होते.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाभाजपाराजकारण