...म्हणून वाईनबाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिकांना दिली; भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 08:37 AM2022-01-28T08:37:12+5:302022-01-28T08:41:13+5:30
मुंबई: वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये ...
मुंबई: वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलेला असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावरच वायनरी चालत असल्याने निर्णय अतिशय महत्त्वाचा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. गांजाप्रकरणात असलेला अनुभव लक्षात घेऊन वाईन बाबतची घोषणा करण्याची जबाबदारी नवाब मलिक यांना दिली असावी, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात राज्यातील किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठक संपल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. "महाराष्ट्रात बऱ्याच वायनरी आहेत. त्यामुळे आता सरकारने नवीन धोरण ठरवलं आहे. सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीची परवागनी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक हजार स्वेअर फुटापर्यंतच्या सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे", असं नवाब मलिक म्हणाले.
भाजपा नेत्यांना लगावला टोला-
राज्याच्या वाईन धोरणावर टीका करणाऱ्या भाजपाचाही नवाब मलिक यांनी यावेळी समाचार घेतला. "गोव्यात आणि हिमाचलमध्येही भाजपाने हेच धोरण आणले आहे. त्यांची सत्ता असलेल्या अनेक राज्यात भाजपाने वाईन विक्रीचं धोरण स्वीकारलं आहे. इथे मात्र ते विरोध करत आहेत", असा टोला नवाब मलिक यांनी लगावला.