मुंबई: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्यात राजकीय फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले. १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना ईडीने अटक केली आहे. देशमुखांच्या अटकेला काही तास उलटत नाही तोवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही कारवाई करण्यात आली. आयकर विभागाने अजित पवारांच्या ५ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याचपार्श्वभूमीवर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
अजित पवार यांच्या मालमत्ता जप्त केल्याची ओरड केली जात आहे. मात्र, त्या मालमत्ता त्यांच्या आहेत की नाहीत याचीही खातरजमा केली जात नाही. काहीही सिद्ध होत नसताना केवळ बदनामीसाठी हे सगळं भाजप करत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीची प्रतिमा मलीन करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी जनतेचा स्वच्छ कौल महाविकास आघाडीलाच आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढे भाजपची कशी धूळधाण उडाली हे सगळेच पाहत आहेत. त्यामुळे निवडणुकांना आम्ही घाबरत नसून पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल', असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी लगावला होता. जयंत पाटील यांच्या या विधानावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, पुन्हा निवडणूक घेतली तर राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत ती संख्या ४० वर येईल', असे जयंत पाटील म्हणतात. चला, स्वीकारले आव्हान. होऊन जाऊ दे... दूध का दूध और पानी का पानी, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्यावरील कारवाईनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, उशीरा का होईना न्याय मिळाला अशी राज्यातील जनतेची भावना असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील १० मंत्री त्यांच्याकडे सॉलिसिटरच्या ऑफिसमध्ये गेले असतील असा दावा. १० नेत्यांनी मनी लॉन्ड्रिंग केले आहे. भ्रष्टाचाराचा पैसा बेनामी असतो, रोकड असते. तो किती दिवस ठेवायचा. हवालाच्या माध्यमातून या पैशाची गुंतवणूक होती. काळ्याचा पांढरा करुन गुंतवणूक केली जाते. या १० नेत्यांची अवस्था बिकट होणार आहे असा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.