भाजपाच्या कार्यक्रमाच्या सभागृहात लपून बसायचं, अन्...; रोहित पवारांवर भाजपाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:50 PM2022-05-17T17:50:28+5:302022-05-17T18:00:14+5:30
भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई- पुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निषेध केला. याप्रकरणी ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवारांच्या या ट्विटनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. भाजपच्या पक्षीय कार्यक्रमाच्या सभागृहात लपून येऊन बसायचं आणि कार्यक्रम सुरू झाला की गोंधळ उडवून द्यायचा, ही केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देण्याची कोणती रीत रोहित जी?, महिलांच्या पदराआडून विरोधकांच्या कार्यक्रमात गोंधळ घालायचा हाच का तुमच्या राजकारणाचा उच्च स्तर आणि थोर संस्कृती?, असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती इराणी यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली.
सदर प्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भस्मराज तिकोणे (रा. कसबा पेठ, पुणे), प्रमोद कोंढरे ( रा. नातूबाग, पुणे) आणि मयूर गांधी (रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालगंधर्व रंगमंदिर येथे अमित शाह आणि भाजपाची वाटचाल या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन सुरु होते. यावेळी स्मृती इराणी यांना वाढत्या महागाई आणि घरगुती गॅसच्या किमतीबाबत राष्ट्रवादीच्या महिला निवेदन देण्याकरिता गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या या तीन कार्यकर्त्यांनी महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच साडीचा पदर ओढून अश्लील हातवारे केले. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.