Join us

तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना नरेंद्र मोदी भीक घालणार नाही- अतुल भातखळकर

By मुकेश चव्हाण | Published: December 09, 2020 8:51 PM

तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असं अतुल भातखळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उद्देशून म्हटले आहे. 

नवी दिल्ली/मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीचा विचार न करता पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या मांडून आहेत. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भीक घालणार नाहीत, असं ट्विट भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

अतुल भातखळकर म्हणाले की, दमबाजी कुणाला करताय, असा सवाल उपस्थित करत देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करुन नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवले आहे. ते तुमच्या सारख्या भपकेबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी, असं अतुल भातखळकर यांनी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना उद्देशून म्हटले आहे.    

तत्पूर्वी, कृषी कायद्यावर कोणत्याही प्रकारची चर्चाच होऊ शकत नाही. हा कायदाच मागे घ्यावा लागेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली आहे. जोपर्यंत केंद्र सरकार निर्णय घेत नाही, तोपर्यंत शेतकरी दिल्लीतून हलणार नाहीत, असा इशाराही मेधा पाटकर यांनी दिला होता. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी दिल्लीत तळ ठोकून आहे. त्यांची दखल सरकारला घ्यावीच लागणार आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर सामान्य माणूसही बळीराजाच्या आंदोलनात सामिल झाला आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकरी इथून हालणार नाही, असं मेधा पाटकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोध पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. सर्वांनी यावेळी राष्टपतींकडे कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. थंडीच्या दिवसात शेतकरी रस्त्यावर आहेत. अगदी शांतपणे ते आपली नाराजी सरकारसमोर मांडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावणं हे सरकारचं कर्तव्य आहे", असं शरद पवार म्हणाले. विरोधकांनी राष्टपतींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. 

शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास राहीला नाही: राहुल गांधी

शेतकऱ्यांच्या ताकदीसमोर कुणीच उभं राहू शकत नाही. शेतकरी आता मागे हटणार नाहीत आणि कुणालाही घाबरणार नाहीत. जोवर हे काळे कायदे मागे घेतले जात नाहीत तोवर शेतकरी आंदोलन सुरुच ठेवतील, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी म्हणाले. यासोबत शेतकऱ्यांना आता मोदी सरकारवर विश्वास राहिला नसल्याचा घणाघात राहुल यांनी यावेळी केला. 

कोणते आहेत ते तीन कायदे, ज्याचा होतोय विरोध

1. मूल्य उत्पादन आणि कृषी सेवा अधिनियम, 20202. आवश्यक वस्तू (संशोधन) अधिनियम, 20203. शेतकऱ्यांचं उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) अधिनियम, 2020

टॅग्स :अतुल भातखळकरशेतकरी संपभाजपामेधा पाटकर