मुंबई : राज्यातील भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय आपल्याविरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया थांबणार नाहीत. ते बदल्याच्या भावनेने वागत असताना आपण का शांत बसायचे, असा संताप मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील भाजपच्या खात्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काढा अन् पुढची पावले उचला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिली. बैठकीत नियमित विषयांवर चर्चेनंतर अधिकाऱ्यांना जाण्यास सांगितले. त्यानंतर सध्याच्या राजकारणावर वादळी चर्चा झाली.
उद्धव ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी टोला लगावला आहे. 'गरजने वाले बादल बरसते नहीं', असं म्हणत सत्तेत येऊन तुम्हाला अडीच वर्षे झाली. चौकशीच्या फक्त घोषणा होत आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
ठाकरे झाले आक्रमक-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अतिशय आक्रमक होते. जवळपास वीस मिनिटे ते बोलले. आपले मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला नाही. मात्र, कधी नव्हे इतके खालच्या पातळीवरचे राजकारण भाजपकडून खेळले जात असल्याचे ते म्हणाले.
आज होत असलेल्या कारवायांना अजिबात घाबरण्याचे कारण नाही. यांच्या दबावाखाली येण्याचे काहीही कारण नाही. तुम्ही मला त्यांच्यावर कारवाई करायला सांगत आहात. मी तर आहेच; पण तुम्ही आपापल्या खात्यातील आधीच्या पाच वर्षांतील प्रकरणांच्या फायली तयार करा. शेवटी माझी मदत घ्या, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.