Join us

'पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन उद्धव ठाकरेंना झोंबलेलं दिसतंय'; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 5:26 PM

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुंबई- आज पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविषयक बैठकीत पेट्रोलडिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोलडिझेलचे दर चढेच राहिले आहेत, असा आरोप केला. मात्र महाराष्ट्रासारख्या, देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत जी सापत्न वागणूक दिली जात आहे, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारने वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी, एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. मात्र केंद्राने यावर काहीही पाऊल उचलले नाही. उलटपक्षी राज्याने विविध आपत्तीत निकषापेक्षा जास्त मदत करून दिलासा दिला आहे. तोक्तसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली, अशी  तीव्र प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केली. 

उद्धव ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करुन टोला लगावला आहे. पेट्रोल-डिझेल वरचा कर कमी करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन मुख्यमंत्र्यांना झोंबलेले दिसते. इंपोर्टेड दारूवर सवलत दिलीत ना? बिल्डरांना सूट देताना? मग सर्वसामान्य जनतेसाठी पेट्रोल-डिझेल वरचा कर कमी करायला काय हरकत आहे, मुख्यमंत्री महोदय?, असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे, हि वस्तुस्थिती नाही, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिले. कोरोना काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केले. शिवभोजनासारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीभाजपापेट्रोलडिझेल