Join us

"खुर्ची देण्यासाठी सुरु असलेली लगबग पाहा; संजय राऊत यांचे खरे गुरु शरद पवारच"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 1:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन मंगळवारी १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली होती.

मुंबई: राज्यसभेतील १२ खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन करण्यात आले आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन मंगळवारी १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली होती. त्यांच्या समवेत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी केद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनास्थळी शरद पवार दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. सध्या या प्रसंगाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

तत्पूर्वी, संसद परिसरातील आंदोलनाचा व्हिडिओ शरद पवारांनी आपल्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला. यासोबतच ट्विटमधून शरद पवारांनी आंदोलकांना पाठिंबा दिला आहे. संसदेच्या आवारात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ निलंबित खासदारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. राज्यसभेतून निलंबित केलेल्या १२ सहकारी खासदारांना आपण आज भेटलो. तसंच त्यांना आपला पाठिंबा दिला. या खासदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी आम्ही एकजुटीने त्यांच्यासोबत उभे आहोत, असं शरद पवार ट्विटमध्ये म्हणाले.

दरम्यान, खासदारांनी निलंबन मागे घ्यावे यासाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र त्यांनी माफी मागितल्याशिवाय निलंबनाची कारवाई रद्द होणार नसल्याची भुमिका राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी घेतली आहे.निलंबीत खासदार दररोज सकाळी 10 ते 6 वाजेपर्यंत संसदेच्या आवारात धरणे आंदोलन करत आहेत. विविध पक्षांच्या खासदारांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

टॅग्स :संजय राऊतशरद पवारशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसअतुल भातखळकर