नवी दिल्ली: देशातील ५ राज्यांच्या निवडणूक निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. ५ राज्यांपैकी ४ राज्यात भाजपा तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या जवळ पोहचला आहे.
५ राज्यांच्या निवडणूक निकालांवर संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले होते. त्यातच शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपाला बसू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. परंतु निवडणूक निकालावर फारसा परिणाम झाला नसल्याचं दिसून आले.
भाजपाच्या विजयावर महाराष्ट्रातील भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक झालेल्या पाचपैकी चार राज्यात राज्यात आधीही भाजपाच होती आणि विरोधकांनी कितीही टीका केली, तरी आताही भाजपाच येणार आहे. हे यश परफॉर्मन्सचे आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला ते कधीही शक्य होणार नाही. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पेपर फुटल्यामुळे पास झालेले मुख्यमंत्री आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने (AAP) मुसंडी मारली आहे. पंजाबमध्ये एकुण ११७ जागांपैकी आप ९०, काँग्रेस १८, अकाली दल ०६ आणि अन्य १ ठिकाणी आघाडीवर आहे. पंजाबमध्ये आतापर्यंतच्या कलांवरून पंजाबमध्ये आम आदमी पक्ष बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे.
आपच्या कार्यालयांमध्ये जल्लोष-
पंजाबमध्ये सुरूवातीच्या निकालांमध्ये आपनं मोठी मुसंडी मारली आहे. आपच्या कार्यालयांमध्ये सध्या जल्लोष पाहायला मिळत असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंतसिग मान यांचा नवा पोस्टर समोर आला आहे.