मुंबई: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशांवरून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली असून, केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत, असा गंभीर आरोप केला. यावर भाजपने प्रत्युत्तर दिले असून, संजय राऊत काळजी करू नका, ईडी तुमची कायद्यानुसारच चौकशी करेल, असा पलटवार केला आहे.
भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सभापतींना पाठवलेल्या पत्र वाचल्यावर केवळ संजय राऊत यांची कीव करावीशी वाटते. कालपर्यंत अर्वाच्य भाषेत, घाणेरड्या भाषेत देशाच्या पंतप्रधानांपासून ते भाजपच्या छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत टीका करणारे संजय राऊत यांनी आता ईडीला सामोरे जावे. कर नाही, त्याला डर कशाची, अशी टीका भातखळकर यांनी केली.
ED तुमची चौकशी कायद्यानुसारच करेल
यानंतर आता संजय राऊत यांना लोकशाही आठवायला लागली आहे. संजय राऊत यांनी काळजी करू नये. ईडी तुमची चौकशी करेल आणि ती कायद्यानुसारच असेल. राज्यात सत्ता आहे, म्हणून विरोधकांना मारहाण करून त्याचे निर्लज्ज समर्थन करणाऱ्यांना आता घाम फुटलाय. ईडीची कारवाई जेलचा रस्ता दाखवणार या भीतीने ते गारठलेत. पापे मान्य करण्याचे धाडस नसल्यामुळे आकांड-तांडव करतायत. काळा पैसा वाईट दिवस दाखवतोच, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी आज राज्यसभेचे सभापती असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि शरद पवार यांना एक पत्र लिहून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली होती. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपावर गंभीर आरोप केले. या यंत्रणा ठाकरे परिवाराला बदनाम करत आहेत. माझ्यासारख्या नेत्यांना बदनाम करत आहेत. शरद पवार यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये तपास यंत्रणा आहेत. त्या आधी तपास करतील. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावर तुम्ही आलाय का. तुम्ही फेडरल सिस्टिमची वाट लावताय. त्यामुळे यांची संपूर्ण पोलखोल करावी लागेल. याबाबत माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. सगळ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. ही सुरुवात आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.