'...म्हणजे तुमची मानसिक तयारी होती'; संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईवर भाजपाचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:53 PM2022-04-05T15:53:34+5:302022-04-05T15:54:02+5:30
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते.
मुंबई- महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आज मोठी कारवाई करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची अलिबागमधील जमीन आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला आहे. ईडीनं आज संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबागमधील ८ प्लॉट जप्त केले आहेत. तसंच दादर येथील संजय राऊत यांचं राहतं घर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती स्वत: संजय राऊत यांनी दिली आहे.
मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या पीएमसी बँकेतील खात्यातून वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर १२ वर्षांपूर्वी ५० लाख जमा करण्यात आले होते. त्याबाबत ईडीकडून त्यांच्याकडे गेल्या दीड महिन्यापासून विचारणा सुरू होती. संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे प्रवीण राऊत सध्या न्यायालयीन कोठडीत असून पत्राचाळ घोटाळ्यातील पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी करण्यात आल्याचा संशय ईडीला होता. याच अंतर्गत ईडीनं आज मोठी कारवाई करत संजय राऊतांना दणका देण्यात आला आहे. अलिबागमधील एकूण ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट ईडीनं जप्त केला आहे. याचा संबंध संजय राऊत यांच्याशी आहे.
ईडीने संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईवरुन भाजपाने टोला लगावला आहे. मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर..., असा टोला भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
मी तुरुंगात जायला तयार आहे, हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती तर...#ED#SanjayRaut
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 5, 2022
दरम्यान, "आम्ही काही प्रॉपर्टीवाली माणसं नाही. कष्टाच्या पैशातून २००९ साली जागा घेतली होती. ती जागा १ एकर पण नाही. या जागेवर कारवाई करताना कोणतीही माहिती दिली गेली नाही. कोणतीही विचारणा केलेली नाही आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून मला कळतंय की ईडीनं जप्ती आणली आहे. २००९ साली खरेदी केलेल्या जमिनीत आज ईडीला काळंबेरं दिसतंय. आमच्या पत्नी किंवा जवळच्या व्यक्तींकडून घेतलेल्या या छोट्या छोट्या जागा आहेत. राजकीय सूड आणि बदला घेणं कोणत्या थराला गेलंय हे यातून दिसून येतंय", असं संजय राऊत म्हणाले.
माझं राहतं घर जप्त केल्यानं भाजपाला आनंद-
संजय राऊत यांच्याशी निगडीत दादर येथील एक फ्लॅट देखील जप्त करण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यास खुद्द संजय राऊत यांनी दुजोरा देत आपलं राहतं घर जप्त केल्याची माहिती दिली आहे. "आमचं राहतं घर जप्त केलं आहे. मराठी माणसाचं राहतं घर जप्त केलं. भाजपाच्या लोकांना याचा आनंद होतोय. फटाके फोडत आहेत. चांगली गोष्ट आहे. यातून लढण्याची आणखी प्रेरणा मिळते", असं संजय राऊत म्हणाले.