Join us

अनिल देशमुख आणि जितेंद्र आव्हाडांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; भाजपाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 4:47 PM

राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत.

मुंबई:  पालघरच्या डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना १६ मार्च रोजी घडली. या घटनेवरुन सोशल मीडियावर वादंग उठलं असून संबंधित घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तसेच या घटनेनंतर राज्य सरकारवरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्यात वारंवार कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्याची मॉब लिंचिंगची घटना अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. तसेच या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने स्वतः जनतेशी संवाद साधायला हवा होता, तरीही त्यांनी चार दिवस वेळ लावला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसात गंभीर घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका तरुणाला एका मंत्र्याच्या बंगल्यात नेऊन मारहाण करण्यात आली. हजारो कोटींच्या गैरव्यवहारात तपास यंत्रणांना हवा असलेल्या आरोपीला राज्याच्या गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लॉकडाऊनच्या काळात सवलत देण्यासाठी पत्र देण्यात आले. लॉकडउनमुळे संचारबंदी असताना तसेच चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मुंबईत बांद्रा येथे हजारोंचा जमाव कसा जमला असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

आता पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने साधूंचे हत्याकांड झाले. या सर्व घटनेनंतर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्हं निर्माण झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी तात्काळ अनिल देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे ठाणे येथे तरुणाच्या मारहाणप्रकरणी निःपक्ष चौकशीसाठी संबंधित मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील त्वरीत राजीनामा द्यावा अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :अनिल देशमुखचंद्रकांत पाटीलमहाराष्ट्र सरकारमहाराष्ट्र विकास आघाडीजितेंद्र आव्हाडउद्धव ठाकरे