रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान; मी कौतुकही केलं पण....; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:10 PM2020-03-02T16:10:53+5:302020-03-02T16:47:59+5:30
आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत असं सांगत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे.
मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची रविवारी निवड करण्यात आली होती. त्यामुळे आज सामन्याच्या अग्रलेखातून रश्मी ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र रश्मी ठाकरे यांनी देखील आजच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे.
रश्मी ठाकरेंच्या सामना संपादकपदी निवडीवरही अमृता फडणवीसांचे ट्विट
हिंदूंचा स्वाभिमान हा प्रखर राष्ट्रवादाशी जोडला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवाद कदापि मार खाणार नाही. जो राष्ट्रवाद मारण्याचा प्रयत्न करील तो हिंदूंच्याच हातून मार खाईल. कारण आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत असं सांगत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. तसेच दादामियांसारख्या लोकांनी औरंग्याची पिशाचे कितीही उकरून काढली तरी महाराष्ट्राची शांतता भंग पावणार नाही हे दादामियांनी पक्के लक्षात ठेवावे. असे अनेक दादामियां गोधड्या भिजवत होते तेव्हा शिवसेना हिंदुत्व आणि राष्ट्रकार्यासाठी छातीचा कोट करून लढत होती असा टोला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेने अग्रलेखाद्वारे केलेल्या टीकेवर विचारले असता रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान असून मी त्यांचं कौतुक केले होते असे त्यांनी सांगितले. तसेच रश्मी ठाकरे यांच्याकडून अशा टीकेची अपेक्षा नव्हती असं मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही टीका करता येते त्यामुळे मर्यादा कुणीही सोडू नये असा इशारा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
...तर तो हिंदूंच्याच हातून मार खाईल; शिवसेनेचा भाजपावर निशाणा
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मी रश्मी ठाकरेंनी सिद्धिविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद स्वीकारावं असं काही वर्षांपूर्वी सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घराण्यात पदं घेत नाहीत असं उत्तर दिले होते. परंतु आता सगळीच पदं घेत आहे असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
संपादक हे पद लाभाचं पद असल्यामुळं ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. सामना वर्तमानपत्राच्या क्रेडिट लाइनमध्ये आता रश्मी ठाकरे यांचं नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आलं आहे. गेले काही महिने हे पद रिक्त होते. सध्या संपूर्ण जबाबदारी ही संजय राऊत यांच्याकडे होती. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाची भूमिका मांडत होते. देशाच्या राजकारणात सामना वर्तमानपत्रातील अग्रलेखावरुनच शिवसेनेची भूमिका समजून घेतली जाते. त्यावरुनच, चर्चा घडल्या जातात. आता, याच देशपातळीवर चर्चिले जाणाऱ्या सामनाच्या 'संपादक'पदाची जबाबदार रश्मी ठाकरेंकडे देण्यात आली आहे.