Join us

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपा प्रवेशासाठी दिली 5 कोटींची ऑफर, शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधवांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 11:02 AM

भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

मुंबई - भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी 5 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, 'माझ्यासह 25 आमदारांना भाजपा प्रवेशासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. मागील महिन्यात चंद्रकांत पाटील यांनी एका भेटीदरम्यान ही ऑफर दिली होती,' असा गौप्यस्फोट हर्षवर्धन यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधव हे औंरगाबादच्या कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.  'पक्षात आल्यास निवडणुकीचा खर्च भाजपाकडून करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते,', असंदेखील हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.  

भाजपा प्रवेशासाठी पाटीदार नेत्याला 1 कोटींची ऑफर

काही दिवसांपूर्वी, भाजपामध्ये प्रवेश करण्यासाठी मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, असा खळबळजनक आरोप पाटीदार समाजाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला होता. ''यातील 10 लाख रुपयांची रक्कम पक्षप्रवेशासाठी सुरुवातीलाच देण्यात आली. उर्वरित 90 लाख रुपये सोमवारी (23 ऑक्टोबर) देण्यात येणार होते'', असा खळबळजनक आरोप नरेंद्र पटेल यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांना भाजपाला घरचा अहेर दिला होता.

गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते असलेले वरुण पटेल यांनी भाजपा प्रवेशासाठी एक कोटी रुपये देण्याची ऑफर दिली, असा आरोपही नरेंद्र पटेल यांनी केला होता. वरुण पटेल यांनी मात्र नरेंद्र पटेलांचे आरोप फेटाळले होते. शिवाय त्यांनी नरेंद्र पटेल यांना काँग्रेसचे एजंट म्हटले होते. 

टॅग्स :हर्षवर्धन जाधवभाजपाशिवसेनाचंद्रकांत पाटील