"उद्धव ठाकरेंना CM पद सोडायला लागावं यासाठी 'ते' प्लॅनिंग करताहेत, आम्ही नाही!"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 05:39 PM2020-04-23T17:39:26+5:302020-04-23T17:55:34+5:30
राज्यपालांनी अद्याप मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब केलेलं नाही.
मुंबई: कोरोनाच्या सावटाखाली राज्यातील विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरे यांची विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करावी, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र राज्यपालांनी अद्याप मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील नियुक्तीवरून चांगलेच राजकारण तापलं आहे. मात्र आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंञिपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे, असा गंभीर आरोप भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यात आम्ही का पुढाकार घ्यावा असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद सोडायला लागावं यासाठी आम्ही नाही, तर आघाडीतले काही नेतेचं प्लॅनिंग करत असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
Coronavirus: ...म्हणून राज्यातील वाईन शॉप आणि हॉटेल सुरू करा; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना सूचना
उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या नियुक्तीवरुन शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील अप्रत्यक्षपणे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला होता. 'राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है,' असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं होतं. यावर आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत, पण राज्यपालांना दमबाजी करणं कितपत योग्य आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचा सदस्य नसलेल्या कोणत्याही मंत्र्याला पदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधानसभा अथवा विधानपरिषद यापैकी एका सभागृहात निवडून येणं बंधनकारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 2 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपश घेतली आहे. त्यामुळे त्यांची मुदत येत्या 27 मे रोजी संपुष्टात येणार आहे. एप्रिलमध्येच यंदाच्या विधानपरिषद निवडणुका पार पडणार होत्या. पण मार्चमध्ये राज्यात कोरोनाचे संकट आल्यानं या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांनी आमदार करावे, अशी शिफारस काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Coronavirus: कोरोना प्रतिबंधक लस तयार; मानवावर चाचणी घेण्याचे काम सुरू
Coronavirus: दिलासादायक! राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात 1.81 टक्क्यांची घट
Coronavirus: धक्कादायक! वाघिणीनंतर आता मांजरींनाही कोरोनाची लागण; रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ