महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:11 AM2022-05-30T06:11:45+5:302022-05-30T06:11:56+5:30

ओबीसी आरक्षणासाठीच्या भाजपच्या आंदोलनप्रसंगी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते.

BJP Leader Chandrakant Patil's apology to Women's Commission; Controversial statement was made about Supriya Sule | महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

googlenewsNext

मुंबई : ‘सुप्रियाताई व महिलांबद्दल माझ्या मनात आदर आहे. असे असताना केवळ ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही,’ अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाकडे आपला खुलासा पाठवत दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्राग्याने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो,’ असे पाटील यांनी म्हटले आहे. 

ओबीसी आरक्षणासाठीच्या भाजपच्या आंदोलनप्रसंगी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. घरी जाऊन स्वयंपाक करा, दिल्लीत जा किंवा मसणात पण ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा करा, अशा आशयाचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यानंतर राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांना नोटीस बजावून दोन दिवसात लेखी खुलासा मागितला होता. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी आपला लिखित खुलासा आयोगाकडे सादर केला. 

माझ्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दु:ख नाही,’ असे पाटील यांनी म्हटले आहे. 

महिलांबद्दल विचार करून बोलण्याची समज
चंद्रकांत पाटील यांच्या लेखी खुलाशानंतर राज्य महिला आयोगाने मात्र यापुढे विचार करून बोलण्याची समज दिली आहे. चंद्रकांत पाटील यांचा खुलासा प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दु:ख व्यक्त करून सुप्रिया सुळे व समस्त महिलांची दिलगिरी व्यक्त केली आहे. यापुढे कोणत्याही महिलेबद्दल बोलताना विचार करून बोलावे. तसेच आपल्या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का लागू देऊ नये याची काळजी घ्यावी, अशी समज चंद्रकांत पाटील यांना देण्यात आल्याचे महिला आयोगाने  म्हटले आहे.

Web Title: BJP Leader Chandrakant Patil's apology to Women's Commission; Controversial statement was made about Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.