काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल भाषणात राज ठाकरेंनी कमळ या चिन्हावर लढण्याबाबतही गौप्यस्फोट केला, यावर आता भाजपाकडूनचंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेला कमळ चिन्हावर लढण्यासाठी आग्रह करण्याचा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, मी शेवटच्या जागावाटपाच्या चर्चेला १९९५ मध्ये त्यानंतर मी कधी जागावाटपाच्या चर्चेला बसलो नाही. मला दोन तु घे दोन मला दे हे होणार नाही. मग मला सांगितलं आमच्या निशाणीवर लढा, चिन्हावर कॉम्प्रमाइज होणार नाही. मी रेल्वेइजिन चिन्ह सोडणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले होते.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आम्ही कधीही त्यांना कमळ या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला नव्हता, अशी भूमिका आम्ही कधी घेतलेली नाही. तेही कधी हे मान्य करणार नाहीत, त्यांचा मोठा पक्ष आहे. त्यांचं रेल्वेइंजिन चिन्ह आहे, असं स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
काल राज ठाकरे यांनी कमळ या चिन्हावरुन केलेला दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढला आहे.
अपघाताच्या घटनेवरुन राजकारण करणे चुकीचे: बावनकुळे
काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी घातपाताचा आरोप केला. यावर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र संस्कारमय आहे. असे घातपात महाराष्ट्रात कोणी करत नाही आणि त्यांना महाराष्ट्राचे संस्कार कळले नाही. अशा घटनेमध्ये जे राजकारण करतात ते चुकीचे आहे, असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलं.