Join us  

Chitra Wagh: "उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा", चित्रा वाघ यांची मुंबई पोलिसांकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 11:42 AM

 Chitra Wagh on urfi javed: उर्फी जावेदवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करून उर्फी जावेदला बेड्या घालण्याची मागणी केली होती. उर्फी केवळ एकाच कारणाने चर्चेत असते, ते म्हणजे तिची ड्रेसिंग स्टाईल. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. यावरूनच भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शनिवारी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला.

दरम्यान, आज चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. "उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा", अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून सर्वांचे लक्ष वेधले आहे.

"उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा" चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले, "उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उपड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाना मांडलेला बाजार चीड आणणारा आहे."

तिने देहाचे प्रदर्शन चार भिंतीच्या आड करावे - चित्रा वाघ "तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरूर करावे मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाच्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे", अशा आशयाचे पत्र लिहून चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर कारवाईची मागणी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :चित्रा वाघउर्फी जावेदमुंबई पोलीसभाजपा