'मला कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन, मग...'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर पुन्हा संतापल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:00 PM2023-01-03T13:00:51+5:302023-01-03T13:02:10+5:30

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पुन्हा टीका केली आहे.

BJP leader Chitra Wagh has again criticized Urfi Javed. | 'मला कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन, मग...'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर पुन्हा संतापल्या

'मला कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन, मग...'; चित्रा वाघ उर्फी जावेदवर पुन्हा संतापल्या

Next

मुंबई- भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवल्याचा आरोप करत उर्फीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र तिच्यावर आतापर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर निशाणा साधला. याला आता उर्फीने देखील उत्तर दिलं होतं.

आज राजकारण्यांना पाहून वाईट वाटते. लोकांच्या नजरेत येण्यासाठी मला लक्ष्य करत आहे. बलात्कारासाठी माझ्या कपड्यांना दोष देणं, सोयीचं आहे. नेहमीच पीडितेच्या कपड्यांना दोष दिला जातो अनेक मुद्दे आहेत. जसं बेरोजगारी, लाखो प्रलंबित बलात्कार प्रकरणं, खून. या प्रकरणांचे काय?, असं उर्फीने चित्रा वाघ यांना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे. 

उर्फीच्या या उत्तरावर चित्रा वाघ यांनी देखील पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. तिने ज्या भाषेत ट्वीट केलंय ते सांगतानाही मला लाज वाटते आहे. मी स्वतः पोलिसांत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. आज ट्वीट केलंय तिने, पण उद्या मला जर कुठे भेटली तर मी पहिले तिला थोबडवून काढेन आणि मग ट्वीट करेन. काय व्हायचं असेल ते होऊद्या, पण आम्ही महाराष्ट्रात असा नंगानाच चालू देणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. सगळ्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो म्हणून कुणीही नाममात्र कपडे घालून रस्त्यावर फिरायचं. असले चाळे आम्ही चालू देणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. 

नेमकं प्रकरण काय?

चित्रा वाघ यांनी मुंबईचे आयुक्त तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेऊन उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उर्फी जावेद रूपी स्त्री देहाचा बाजार रोखा, अशा विषयाचे पत्र लिहून उर्फीच्या अश्लील कृत्याला आळा घाला असे चित्रा वाघ यांनी म्हटले. चित्रा वाघ यांनी पत्रात म्हटले, "उर्फी जावेद या अभिनेत्रीने भररस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उपड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाना मांडलेला बाजार चीड आणणारा आहे.

कोण आहे उर्फी?

‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी Most Searched Asian 2022 यादीत आली आहे. ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

Web Title: BJP leader Chitra Wagh has again criticized Urfi Javed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.