Join us  

उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत उपस्थित; चित्रा वाघ म्हणाल्या, बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 3:54 PM

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात आज विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांची बैठक सुरु आहे. भाजपाविरोधातले १५ पक्ष या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत देखील पाटण्यात दाखल झाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष बाकी आहे. त्यामुळं सर्वच पक्षांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नितीशकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ते प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. उद्धव ठाकरे विरोधकांच्या बैठकीत सामील झाल्याने राज्यातील सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धवजी बाळासाहेबांचा हा व्हिडिओ पाहा… यात बाळासाहेबांनी लालू प्रसाद यादवला काय म्हटलं होतं ते ऐका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली कशी दिलीय ते समजेल, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच आता अशा नालायका समोर लोटांगण घालण्याची वेळ तुमच्यावर आलीय, असा टोलाही चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. 

दरम्यान, दरम्यान, विरोधी पक्षांच्या या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे,  तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय महासचिव डी राजा, सीपीएम नेते सीताराम येचुरी आणि दीपांकर भट्टाचार्य सामील झाले आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेचित्रा वाघभाजपालालूप्रसाद यादव