मुंबई- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत त्यांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले आणि मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी, कबुली आहे, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिलंय..शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती. शेवटी पक्षातच महाभारत घडलं, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
शेवटी पक्षातच महाभारत घडलं.आता तरी धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी…डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा.कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत…देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाही. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार..नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं, अशी इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.
दरम्यान, जे स्वप्न मुंबईकरांच्या मनातील मुंबईकरीता हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायचे ही जबाबदारी आपली आहे. कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवले. ते स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत, ते इतके आत्ममग्न होते, इतके आत्मकेंद्रीत होते की, स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाहीत. या मुंबईकराकडे त्यांनी कधीही बघितले नाही. आता मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना आपण निवडून आणायचे आहे आणि मुंबईकरांनी जे स्वप्न पाहिले आहे, जे स्वप्न वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिले आहे, ते पूण करण्याचे काम आता आपल्याला करायचे आहे त्यासाठी कामाला लागा,” असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.