मुंबई: लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावी परतत असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी पुढे आल्याने अभिनेता सोनू सूद चर्चेत आला आहे. आतापर्यंत हजारो परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनू सूदने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. मात्र काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.
महाराष्ट्र सरकारला सर्कस संबोधणाऱ्या राजनाथ सिंहांना ठाकरे सरकारने दिलं जोरदार प्रत्युत्तर
संजय राऊत यांच्या या आरोपानंतर मनसेसह भाजपाने देखील निशाणा साधला होता. त्यातच आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील सोनू सूदवरील टिप्पणीवर टोला लगावला आहे. चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या की, डिअर सोनू सूद तू संजय राऊतांकडे लक्ष देऊ नकोस. तू खूप चांगलं काम करत आहे, असं चित्रा वाघ यांनी सांगितले. तसेच आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही असा टोला देखील चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याच्या कामात सोनू सूद यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही होत होते. स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सूद यांना राजभवनावरून बोलावून सूद यांचे कौतुकही केले होते. संजय राऊत यांनी सोनू सूद यांच्यावर टीका करणारा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात छापला होता. संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे राजकीय वादंगाला सुरूवात झाली होती. यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सोनू सूदने ट्विट करत म्हणाला की, "स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं असल्याचे सोनू सूदने सांगितले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.
पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
CoronaVirus News: दिलासादायक! राज्यात ४० हजारांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात
10 जूनपासून नवा नियम लागू; 'या' बँकेतील ग्राहकांना होणार फायदा