'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 03:03 PM2021-07-04T15:03:29+5:302021-07-04T15:05:02+5:30

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्निल लोणकरला श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena MP Sanjay Raut | 'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

'ते प्रस्थापितांचे पोपट आहेत, हे पुन्हा सिद्ध झाले'; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांच्यावर निशाणा

Next

मुंबई/ पुणे: MPSC हे मायाजाल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका तरुणानं पुण्यात आत्महत्या केली आहे. पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्नील लोणकर असं या २४ वर्षाच्या तरुणाचं नावं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या सुसाईड नोटमधे आर्थिक परिस्थितीला कंटाळून आणि एमपीएससीची परीक्षा प्रक्रिया रखडल्याने आत्महत्या करत असल्याच म्हटलं आहे. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेल्याने त्यांने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. 

स्वप्निलचा संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं. आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्निलने पत्र लिहिलं, ज्यात त्याने आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. 'एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका' असे स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. त्याने २०२०मध्येही एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी स्वप्निलला श्रद्धांजली वाहत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. स्वप्नील लोणकर MPSC उत्तीर्ण झालेल्या आमच्या भावाचा ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळं जीव गेला. त्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अपेक्षित होते की, आपल्या नेहमीच्या पहाटेच्या आरवण्यात काहीतरी दोन शब्द बोलतील नाहीतर नेहमीप्रमाणे केंद्राला तरी दोष देतील. पण हे पुन्हा सिद्ध झाले की ते ‘प्रस्थापितांचे पोपट’आहेत, असा निशाणा चित्रा वाघ यांनी साधला आहे. 

 २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता, असं स्वप्निल पत्रात म्हटलं आहे. 

नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील, असंही स्वप्निल आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Web Title: BJP leader Chitra Wagh has criticized Shiv Sena MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.