'रस्सी जल गई, पर बल नही गया'; चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 02:19 PM2023-06-27T14:19:09+5:302023-06-27T14:19:37+5:30
भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: अनियमित पाणीपुरवठा, अपूर्ण नालेसफाई अशा नागरी समस्यांनी हैराण झालेल्या खार, वांद्रे व सांताक्रूझ येथील नागरिकांनी सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली महापालिका 'एच' पूर्व विभाग कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला. मात्र, यादरम्यान तेथे शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केल्याने मोर्चाला गालबोट लागले.
सदर घटनेवरुन सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. या घटनेवरुन भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. अनिल परबांची ''रस्सी जल गई, पर बल नही गया'', असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. कायदेतज्ञ ॲड अनिल परबांनी कायद्याला न जुमानता महापालिका कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारहाण केली. अशा माजोरड्या वृत्तीचा निषेध करायलाच पाहीजे. अधिकाऱ्यां मारहाण करण्याचा चुकीचा पायंडा ठाकरेंकडून पाडला जातोय. अनिल परबांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला पाहीजे, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.
वांद्रे पूर्व ठाकरे गटाच्या शाखेवर कारवाई केल्याने आक्रमक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नागरी प्रश्नांवर जनमत तयार करून पालिका 'एच' पूर्व कार्यालयावर मोर्चा काढला. त्यासाठी गेली तीन दिवस जोरदार तयारी सुरू होती. पाच माजी नगरसेवक या मोर्चात सहभागी झाले होते. पोलिसांनी शिष्टमंडळातील सदस्य सोडून इतरांना प्रवेश नाकारल्याने मोर्चेकरांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली.
सरकार पालिका आणि पोलिसांविरोधात जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर शिष्टमंडळ पालिका सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांना भेटायला गेले होते. तर काही ठाकरे समर्थक पालिका कार्यालयात आधीच शिरले होते. चर्चेच्या वेळी वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखेवर कारवाई करणाऱ्या एका अधिकाऱ्याला बोलावले. त्यामुळे त्यांना पाहून ठाकरे गटाच्या शाखा प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनिल परब यांचा इशारा
आम्ही बाळासाहेबांचा अपमान कधीच सहन करणार नाही. ज्यांनी अपमान केला, त्यांनी परिणामाला तयार राहिले पाहिजे, असे सांगत उद्या पालिका अधिकाऱ्यांना दाखवतो अनधिकृत बांधकामे कुठे आहेत. हिंमत असेल तर ती तोडा. अन्यथा तुम्हालाच आम्ही तोडतो. असाही इशारा त्यांनी दिला.