Join us

खोट्या वाघांकडून दूसरी अपेक्षा तरी काय करणार?; वाघनखांवरुन चित्रा वाघ यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:50 PM

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनच्या म्युझियममधील वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचा करार करण्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. मात्र, आता ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच  आहेत का, असा सवाल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केल्याने राजकारण तापले आहे. 

शिवराय हे महाराष्ट्रासाठी दैवत आहेत. त्यांच्याशी संबंधित महत्त्वाची वस्तू महाराष्ट्रात येत असेल, तर त्याचे मंदिर व्हावे आणि त्याचे जतन व्हावे, अशी शिवभक्तांची भावना आहे. मात्र, सरकारने जनतेच्या भावनांशी खेळू नये. वाघनखे खरी असतील तर पुरावे द्या, जे काय असेल ते लोकांसमोर स्पष्ट करावे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर भाजपाकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आज ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला. 

चित्रा वाघ म्हणाल्या की, आम्ही शिवरायांची वाघनखं इंग्लंडवरून आणणार म्हणून इथल्या काही नकली वाघांना पोटशूळ उठला आहे. छत्रपतींनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढलात् यांच्या ऐतिहासिकतेविषयी शंका घेणाऱ्या त्यांच्या मर्कटलीला यातूनच आलेल्या आहेत. पण, त्या वाघनखांची धार आजही तेवढीच तीव्र आहे, जी या नकली वाघांच्या असत्याचा कोथळा बाहेर काढण्यास सक्षम आहे. आपल्या देदीप्यमान इतिहासाशी संबंधित एक मौल्यवान ऐवज या मावळ मातीत दाखल होतोय, त्याचा अभिमान बाळगायचं सोडून वाघनखं आणणाऱ्यांचा दुस्वास करायचा, हे मोठंच करंटेपण आहे.  पण, काँग्रेसच्या दावणीत गुलामी करणाऱ्या खोट्या वाघांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार...?, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि आता त्यांनी वापरलेल्या वाघनखांबाबत शंका उपस्थित करणे दुर्दैवी असून; जेव्हा ब्रिटेनशी प्रत्यक्ष करार करण्याची वेळ आली त्याच वेळी केवळ जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आमदार पराग अळवणी  यांनीही मनोगत व्यक्त करुन सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकालीन शस्त्र असलेली ही वाघनखे ब्रिटनच्या विक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सुधीर मुनगंटीवार रवाना झाले आहेत. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजचित्रा वाघसुधीर मुनगंटीवार