मुंबई- दिल्ली निर्भया हत्याकांडांने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणात संपूर्ण देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आता. त्यामुळे महिला अत्याचारांच्या वारंवार घटनेच्या विरोधात निर्भय फंड तयार करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने २०१३ साली महिला सुरक्षेसाठी निर्भय फंडाची स्थापना केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी हा फंड आहे. मात्र, या निर्भया फंडाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर आरोप केला आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या निर्भया फंड हा लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा फंड होता. या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी आणण्यात आलेली वाहने लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी वापरणं हे चुकीचं आणि दुर्दैवी आहे. तसेच या सरकारमध्ये व्हीआयपी कल्चर लागू असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला आहे.
सुप्रिया सुळेंच्या या आरोपावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मविआच्या काळात निर्भया पथकासाठी २२० वाहनं खरेदी करण्यात आली होती. त्यातील १२० गाड्या या ९४ पोलीस स्टेशनसाठी वापरण्यात आल्या. तर ९९ वाहनं इतर विभागांना दिले गेले. त्यातील १२ वाहनं ही व्हिव्हिआयपी मंत्र्यांच्या सेवेत देण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, सुनिल तटकरे, काँग्रेसचे सुनिल तटकरे, विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे सुभाष देसाई यांचा समावेश असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच मविआच्या काळात सुप्रिया सुळे यांच्या ताफ्यात निर्भया पथकाची गाडी वापरण्यात येत होती, असं म्हणत ताई तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या या आरोपावर सुप्रिया सुळे काय प्रत्युत्तर देणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाच्या आमदारांना निर्भया फंडमधून Y+ सुरक्षा देण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या डीजींना याबाबत पत्र लिहिण्यात आलं आहे. आमदारांना सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या गाड्या परत घेण्याची मागणी या पत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निर्भया फंडाची स्थापना राज्यात महिलांच्या सुरक्षेसाठी खर्च करायला झाली होती, हा प्रकार म्हणजे महिला सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.