Join us

अजित पवारांना क्लीन चिट मिळाल्याबद्दल भाजपा नेत्यानं केलं अभिनंदन अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 7:07 PM

अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत शनिवारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

यातच, कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी अजित पवार यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केल्याचे समजते.

अवधूत वाघ यांनी सिंचन प्रकरणांची चौकशी बंद करण्याबाबतचे पत्रक शेअर करत 'अभिनंदन अजित पवारजी' असे ट्विट केले होते. मात्र, त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी हे ट्विट डिलीट केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली. त्यानंतर कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी त्यांना क्लीन चिट मिळाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.  

दरम्यान, कथित सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एसीबीने मोठा दिलासा आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेली सिंचन प्रकल्पाच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली आहेत. एसीबीने याबाबतचे पत्र अमरावतीचे एसीबीचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहे. त्यामुळे अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :अजित पवारभाजपामहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस