'भाजपचा नेता पहाटे ३.३० वाजेपर्यंत मुंबईत बारमध्ये नाचतो'; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 07:14 PM2023-05-01T19:14:05+5:302023-05-01T19:15:08+5:30

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत.

'BJP leader dances in bar in Mumbai till 3.30am Sanjay Rauta's letter to Devendra Fadnavis | 'भाजपचा नेता पहाटे ३.३० वाजेपर्यंत मुंबईत बारमध्ये नाचतो'; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

'भाजपचा नेता पहाटे ३.३० वाजेपर्यंत मुंबईत बारमध्ये नाचतो'; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

googlenewsNext

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. काल रात्री मुंबईतील एका बारमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांनी दारु पिऊन राडा केल्याचा आरोप या पत्रात केला आहे. या बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचीही मागणी राऊत यांनी केली आहे. यावेळी मोहित कंबोज यांनी पोलिसांना शीवीगाळ केल्याचा आरोपही राऊत यांनी या पत्रात केला आहे. 

अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी हे पत्र ट्विट केले आहे. या पत्रात राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाचा दाखला देत आरोप केले आहेत. 'पुणे पोलिसांनी ऑस्कर पुरस्कार विजेत्या #ARRahmanconcert ला वेळ मर्यादा ओलांडल्याबद्दल मध्येच थांबवले. परंतु, दुसरीकडे मुंबईतील भाजपचा एक नेता पहाटे ३.३० वाजेपर्यंत मुंबई बारमध्ये नाचतो.श्री @Dev_Fadnavis कायदा सर्वांना समान नाही का?
की तुमचे नेते कायद्याच्या भूमीपेक्षा मोठे आहेत?, असं ट्विटमध्ये म्हटले आहे. 

संजय राऊत यांनी दिलेल्या पत्रात काय आहे? 

मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर 'रेडिओ' बार हा पहाटे ३.३० वाजेपर्यंत चालू होता व आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रैफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले. तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कम्बोज हे मद्यधुंद अवस्थेत होते. श्री. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कम्बोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य पध्दतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या, असा आरोप या पत्रात राऊत यांनी केला आहे.

"हिंमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा. मी आता देवेंद्रला फोन करतो बघा," असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले. पोलिसांसमोर कम्बोज हे त्याही अवस्थेत दारू पित राहिले. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसी टीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कम्बोज हे वारंवार देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचा उल्लेख करीत असल्याने पोलीस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. रेडिओ' बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. ही बाब गंभीर आहे, खार पश्चिमेचा 'रेडिओ' बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित 'रेडिओ' बारचा परवाना रद्द करावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. 

Web Title: 'BJP leader dances in bar in Mumbai till 3.30am Sanjay Rauta's letter to Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.